♦ एटीएम नेहमीच “आउट ऑफ सर्व्हिस”
मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरात दररोज आजूबाजूच्या खेड्यांवरून कार्यालयीन कामा करीता,बँकेच्या कामाकरिता येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते.बँकेत लागलेल्या लाईन मध्ये उभे राहून पैसे काढण्यापेक्षा एटीएम वरून त्वरित पैसे काढून बाजारपेठेतील व्यवहार करता येतील या आशेने मारेगांव येथे आलेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड होताना दिसतोय.संपूर्ण तालुक्याचा भार असलेले स्टेट बँकेचे एटीएम खूप स्लो चालत असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी मारेगाव ही एकमेव मोठी बाजारपेठ आहे.ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची दिवसभर शहरात चांगलीच रेलचेल असते.काम कुठलेही असो पैशाची गरज ही भासनारच.सद्यस्थितीत शहरात मात्र स्टेट बँकेचे एकच एटीएम सुरू असल्याने संपूर्ण तालुक्याचा भार या एकाच एटीएम वर येऊन पडलाय. म्हणूनच की काय स्टेट बँकेचे एटीएम गेल्या काही दिवसापासून खूप स्लो चालायला लागले आहे.एकच बटन दोनदा तीनदा दाबावी लागते तर कधी एटीएम कार्ड एटीएम मशीन मध्ये टाकल्यानंतर प्रोसेस होताना ताटकळत वाट पहावी लागत असल्याने एखाद वेळी चूक होऊन ग्राहकाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”फाईव्ह जी” च्या जमान्यात शहरातील एटीएमची स्पीड मात्र “टू जी “सारखी झाल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून एटीएम मधून रक्कम काढताना अडचण येत आहे.त्यामुळे एटीएम मशीन “असून अडचण आणि नसून कोळंबा”अशी म्हणायची वेळ शहरासह तालुक्यातील नागरिकांवर येऊन पडली आहे.