खडकी (बा) येथे अवैध देशी दारू विक्रीविरोधात;कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूची खुलेआम विक्री सुरू असून यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा अध्यक्ष देवानंद नामदेव गुंडेकर यांनी संबंधित प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. अवैध देशी दारू विक्री तात्काळ बंद करून दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे.
गुंडेकर यांनी सांगितले की, याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली ही विक्री थांबवण्यासाठी पोलिस व महसूल विभागाने तात्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
दरम्यान, गावकऱ्यांनीही अवैध दारू विक्रीमुळे वाढणारे भांडणतंटे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कुटुंबांवरील परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता असून, होणाऱ्या परिणामांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे.



