सरसम बु येथील जि.प.शाळेमागील दलित वस्ती विकासापासून कोसो दूर
ग्रामपंचायतचे जाणूनबुजून दुर्लक्ष

हिमायतनगर – प्रभु कदम
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील जिल्हा परिषद शाळेमागील दलित वस्ती गेली अनेकवर्ष विकासापासून कोसो दूर आहे. या पंचवार्षिक कालावधीत कोणत्याही सरपंच, ग्रामसेवक तथा सदस्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसून कोणत्याही सोयीसुविधा पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप दलित वस्तीतील नागरिक करत आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.हे गाव लोकसंख्येच्या मानाने मोठे असून दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.वार्ड क्रं १ मधील जिल्हा परिषद शाळेच्या मागील दलित वस्तीत मात्र गेल्या अनेक वर्षापासून विकासाची गंगा यायचे सोडून द्या पण विकास हा शब्द सुद्धा या वस्तीला दिसला ना ऐकू आला.नेहमीच सत्ताधारी सरपंच तथा सदस्यांनी या दलित वस्तीतील कुणाची तक्रार तर सोडा पण साधी फिर्याद देखील ऐकली नाही.या दलित वस्तीत आलेल्या रस्त्याची कामे काही सदस्यांनी आपल्या आका च्या मदतीने पळवून नेतात अन आपल्या घराकडे,आपल्या गल्लीत कामे करून घेतात ही या दलित वस्तीतील नागरिकांची कुचंबना नव्हे का ? इतकेच नाही तर रस्ता करण्यासाठी सहा ते सात ट्रॅक्टर दगड टाकूनही अजूनही कामाला सुरुवात नाही की त्याचे नाव काढले जात नाही. आणि एक प्रतिष्ठित अन पदावर राहिलेला व्यक्ति म्हणतो की हा रस्ता झाला तर मी करून देणाऱ्याच्या घरी पाणी भरेल. म्हणजे एवढी यांची मानसिकता नीच बनलेली दिसून येत आहे.
उन्हाळ्यात सुद्धा याच दलित वस्तीत पाण्यासाठी सुविधा पुरविण्याच्या नावावर निधी उचलून फस्त करण्यात आला अन त्या निधीतून फक्त एक टाकी अन टाकी ठेवण्याचा स्टॅन्ड लावून ग्रामपंचायत मोकळी झाली.शेवटी पाणी अजूनही त्या टाकीत आले नाही अन पाणी मिळालेच नाही. या वस्तीतील बिचारे नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करतच राहिले. यात भर म्हणजे याच वस्तीतील खांबावरील अनेक बल्प खराब झालेत यामुळे अनेक दिवसापासून लोकांना अंधारातच रहावे लागत आहे. याकडेही ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत.
गावागाड्यातील राजकारणामुळे ही दलित वस्ती मात्र पुरती पिचून गेली आहे अन इथल्या नागरिकांना वाटते की आम्ही सरसम गावात आहोतच की नाही ? की फक्त मतदानापुरता आमचा वापर केला जातो ? कोणतीच योजना व सुविधा ग्रामपंचायत पुरवत नसल्याने इथले नागरिक त्रस्त झाले आहेत.याच वार्डातून गावाच्या सरपंच निवडून आल्या पण त्यांनीही याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.
सरसम बु.ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक,उपसरपंच तथा सदस्यांनी या दलित वस्तीला विकासापासून वंचित ठेवण्याचा जणू चंगच केला आहे हे प्रकर्षाने दिसून येत आहे.
यासाठी गटविकास अधिकारी यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या दलित वस्तीतील विकासापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनीही या बाबीकडे लक्ष वेधून या दलित वस्तीतील नागरिकांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे.



