♦ प्रलंबित मागण्या निकाली लावा-कोतवाल संघटनेची मागणी
महसूल विभागाचा गावपातळीवर काम करणारा कर्मचारी म्हणून कोतवाल यांची ओळख आहे.काम कोणतेही असो महसूल विभागाला सर्वप्रथम आठवण येते ती याच कोतवालाची.महिनाभर कामाचा ताण आणि महिना संपल्यावर घरी किराण्याची वानवा अशा अवस्थेत असलेल्या कोतवाल यांना अजूनही मानधन वाढीची अपेक्षा आहे.
इंग्रजांच्या काळापासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे.महसूल विभागाची गावपातळीवरील सर्व प्रकारची कामे याच कोतवालांमार्फत केली जातात.महसुलाची कामे,निवडणुकीची कामे,तलाठ्यांच्या हाताखालील कामे तसेच बीएलओ ची कामे ही सर्व कामे याच कोतवालांकडून केली जातात.यासाठी मिळणारे मानधन मात्र तुटपुंजे आहे.
मारेगाव तालुक्यासहित जिल्ह्यामध्ये कोतवालांची अनेक पदे रिक्त आहेत.या रिक्त असलेल्या कोतवालांच्या कामाचा ताणही असलेल्या कोतवालांवर पडत असतो. गावामध्ये दवंडी पिटवणे,शेतकरी व संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देणे, शेतकऱ्यांकडील शेतसाऱ्याची वसुली करणे, महसूल गोळा करणे, जमीन सर्वेक्षणासाठी रक्कम घेऊन पावत्या तयार करणे,पीक पाहणी अहवाल तयार करणे,शासनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे,मयताच्या वारसांची खरी माहिती प्रशासनाला देणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे, ई पीक नोंदणीचे कामकाज पाहणे, पावसाळ्याच्या दिवसात रात्रपाळीचे काम करणे आणि अतिवृष्टीचा आढावा वरिष्ठांना देणे आदी कामांसाठी शासनातर्फे या कोतवालांना भत्ता सुद्धा दिला जातो.पण तो भत्ता म्हणजे या कोतवालांची थट्टामस्करी असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहे.
हिवाळी अधिवेशनात कोतवाल संघटनेने आंदोलन केले.सदर आंदोलनात महसूल मंत्र्यांनी लवकरच प्रश्न निकाली लावला जाईल अशी ग्वाही सुद्धा दिली होती.परंतु अजून पावेतो कोतवालांच्या मागण्यांवर कुठलाही निर्णय झालेला नाही.सगळीकडे महागाईचा आगडोंब उसळला असताना अवघ्या ७५०० रुपये अशा तुटपुंज्या मानधनात घर कसे चालवावे…?हा प्रश्न कोतवालांना पडला आहे.शासनाने सदर बाबींची तात्काळ दखल घेऊन मागण्या मार्गी लावाव्या,अशी मागणी कोतवाल संघटनेकडून जोर धरू लागली आहे.