
हिमायतनगर प्रतिनिधी /-
तालुक्यातील मौजे पळसपुर गावासह शेतातील वीज पुरवठा महावितरणचे अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे सतत खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांसह गावकरी यांनी थेट हिमायतनगर येथील महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन ग्रायस्थांनी पळसपुर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वाढलेला लोड तात्काळ कमी करून कृषी पंपाचा वीज पुरवठा आणि गावातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन महावितरणचे अभियंता राम चव्हाण यांना दिले आहे.
गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील कृषी पंपाचा वीजपुरवठा आणि गावातील वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्यामुळे गावकरी तसेच शेतकरी चांगलेच त्रासून गेले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावात साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. तसेच लहान बालके आजारी पडत आहेत. लहान बालके रात्रभर रडत असल्याने त्यांच्या पालकांना रात्र जागून काढावी लागत आहे.
ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांसह शेतकरी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी,उपसरपंच, सदस्य यांनी थेट महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन आपली व्यथा मांडली.
सदर निवेदनात पळसपुर गावासाठी वेगळे फिटर देण्यात यावे. पळसपुर गावासाठी शंभरच्या दोन डीपी देण्यात याव्यात. ऑपरेटर, लाईनमन यांचा मोबाईल चालू ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आले आहेत.
निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय उपकार्यकारी अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय हिमायतनगर, सहाय्यक अभियंता साहेब ग्रामीण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय हिमायतनगर यांना देण्यात आले. तसेच या निवेदना सोबत स्मरणपत्र सुद्धा देण्यात आली आहेत.
यावेळी सरपंच प्रतिनिधी लक्ष्मण मांजरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रकाश वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, उपसरपंच गजानन देवसरकर, सुभाषराव वानखेडे, नागोराव वानखेडे, नागोराव विश्वनाथ वानखेडे, विष्णू जाधव , सदस्य संजय वानखेडे, दाऊ गाडगेवाड, बालाजी चिंताकुंटे, संभाजी वानखेडे, अंकुश सूर्यवंशी, तुकाराम वानखेडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.